न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन भागात असणाऱ्या ट्रम्प टॉवरमध्ये सोमवारी अचानक आग लागली. मात्र ही आग नियंत्रणात असून त्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसून कोणीही जखमी नसल्याचे ‘एनबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. ही आग लागली तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टन येथे होते.

न्यूयॉर्कमधील अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प टॉवरला आग लागल्याचा फोन सकाळी ७ वाजता आला. ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागली असल्याची माहिती फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने दिली. माहिती मिळाल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आग काही प्रमाणात पसरल्याचे चित्र होते. हा धूर परिसरात बऱ्याच प्रमाणात पसरला होता. या इमारतीत काही अलिशान घरे आणि व्यावसायिक कार्यालये आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी १९७९ मध्ये ही इमारत खरेदी केली होती. या इमारतीला एकूण ६३ मजले असून ट्रम्प यांचे या इमारतीत ३ मजली पेंटहाऊस आहे. या ट्रम्प टॉवरला उत्तरेकडील व्हाईट हाऊस म्हणूनही ओळखले जाते.