पीटीआय, सेव्हिल (स्पेन) : ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी’ने बुधवारी भारतीय हवाई दलाकडे (आयएएफ) पहिले ‘सी २९५’ हे वाहतूक विमान सुपूर्द केले. भारतीय हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २१ हजार ९३५ कोटींना ५६ ‘सी २९५’ वाहतूक विमाने खरेदी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस कंपनी’बरोबर करार केला होता. बुधवारी स्पेनमधील सेव्हिल शहरात एअरबस कंपनीच्या उत्पादन प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात भारतीय हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांना हे विमान सुपूर्द करण्यात आले.

या करारानुसार ‘एअरबस’ २०२५ पर्यंत सेव्हिल शहरातील उत्पादन प्रकल्पातून भारताला सुसज्ज स्थितीतील १६ ‘सी २९५’ विमाने पुरवणार आहे. उर्वरित ४० विमाने नंतर दोन्ही कंपन्यांतील औद्योगिक भागीदारी कराराचा भाग म्हणून ‘टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड’द्वारे (टीएएसएल) भारतात उत्पादित करून त्यांची बांधणी (असेम्बल) केली जाईल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोदा येथे या विमानांच्या निर्मिती सुविधेची पायाभरणी केली होती.

खासगी कंपनीद्वारे भारतात बनवले जाणारे हे पहिले लष्करी विमान असेल. भारतीय हवाई दल साठ वर्षांपूर्वी सेवेत दाखल केलेल्या ‘एव्हरो-७४८’ या जुन्या विमानांचा ताफा बदलून ही ‘सी२९५’ विमाने खरेदी करत आहे. ‘सी२९५’ हे एक अद्ययावत वाहतूक विमान मानले जाते. त्यातून ७१ सैनिक अथवा ५० ‘पॅराशूटर’ची वाहतूक युद्ध अथवा आणीबाणीच्या काळात करता येऊ शकते. याशिवाय ज्या ठिकाणी सध्याची अवजड विमाने पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम ठिकाणी लष्करी उपकरणे आणि रसद पुरवठा करण्यासाठी याचा वापर केला जातो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडित अथवा आजारी नागरिकांना तातडीने हलवण्यासाठीही या विमानांचा उपयोग होऊ शकतो. हे विमान विशेष मोहिमांशिवाय आपत्तीच्या-आणीबाणीच्या स्थितीत सागरीत किनाऱ्याच्या भागात गस्त घालू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, एअरबसने सांगितले की कंपनी आपल्या भारतीय औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे विमान उत्पादन आणि देखभाल सुविधा भारतात आणेल. भारतासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या ‘सी २९५’ विमानाने मे महिन्यात सेव्हिल येथे आपले पहिले यशस्वी उड्डाण केले. दुसरे विमान सेव्हिल येथील उत्पादन प्रकल्पात बांधणीच्या अंतिम टप्प्यात असून, पुढील वर्षी मेमध्ये ते भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. भारतीय हवाई दलातील सहा वैमानिक आणि २० तंत्रज्ञांनी सेव्हिल येथे आधीच दीर्घ प्रशिक्षण घेतले आहे. बडोदा येथे ‘सी २९५’ विमानाचे उत्पादन आणि उत्पादन प्रकल्प पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगात भारतीय हवाई दलाकडे सर्वाधिक ‘सी २९५’ विमाने असतील.