चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिला फोटो पाठवला आहे. हा फोटो चंद्रापासून २६५० किमी अंतरावरुन काढण्यात आला आहे. चंद्राचं सौंदर्य किती अलौकिक आहे हेच दाखवणारा हा फोटो आहे.  चांद्रयान 2 ने त्याचा अवघड टप्पा २१ ऑगस्ट रोजी पार केला. चांद्रयान 2 हे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. २१ ऑगस्टला सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली.

१४ ऑगस्टला हे यान चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. चांद्रयान २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम असून त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय व खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान १ च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो. आता याच चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिलावहिला फोटो पाठवला आहे.