व्यापारी जहाजांना चाच्यांपासून संरक्षण देण्याच्या नावाखाली सागरी मार्गाने अनियंत्रितपणे खासगी शस्त्रागारे तरंगत आणणाऱ्या परदेशी योद्धय़ांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब असून त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला गंभीर धोका आहे, त्यामुळे दहशतवादी घुसखोरी करू शकतात व २६/११च्या मुंबई हल्ल्यासारखा हल्ला त्यामुळे होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा नौदल प्रमुख डी.के.जोशी यांनी बुधवारच्या नौदल दिनाच्या पाश्र्वभूमीवर एका पत्रकार परिषदेत दिला आहे.
ते म्हणाले, की चाचेगिरीप्रवण भागात व्यापारी जहाजांसाठी ठरवून दिलेले अति जोखमीचे प्रदेश आता बदलण्याची गरज आहे. या प्रदेशांचे विस्तारीकरण केल्याने चार भारतीय मच्छीमारांना इटलीच्या नौसैनिकांनी केरळच्या सागरी प्रदेशात ठार केले होते. तरंगती शस्त्रागारे हा चिंतेचा विषय आहे व त्यावर कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे सुरक्षेला मोठा धोका आहे. या तरंगत्या शस्त्रागारांच्या नावाखाली आपल्या देशात दहशतवादी घुसखोरी करू शकतात. जर अनियंत्रित शस्त्रे व दारूगोळा घेऊन ही जहाजे फिरत असतील, तर त्यात कुठली शस्त्रास्त्रे आहेत व त्यावरील रक्षक ती कुणाला देत आहेत हे समजू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही देशात पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो.
अमेरिकेचे एमव्ही सीमन गार्ड ओहिओ हे जहाज तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे पकडण्यात आले होते त्या वेळी शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली. काही देशांचे योद्धे हंगामी तत्त्वावर व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी असलेल्या तरंगत्या शस्त्रागाराच्या रूपातील जहाजावर खासगी सशस्त्र रक्षक म्हणून काम करतात, असे दिसून आले आहे.
हे सागरी योद्धे किंवा रक्षक जवान पाकिस्तानचे आहेत असे म्हणायचे आहे काय या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. आपल्याला जो संदर्भ द्यायचा होता तोच आपण दिला आहे असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत तरंगती शस्त्रागारे व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याच्या नावाखाली चाचेगिरीप्रवण सागरी क्षेत्रात वापरली जातात पण त्यांची रचना ही फार शिस्तबद्ध नसते. या अनियंत्रित पद्धतीमुळे अडचणी येऊ शकतात. येणाऱ्या जहाजाचा माग काढणे मुश्किल होऊ शकते व त्या तरंगत्या शस्त्रागाराच्या रूपातील जहाजात कोण रक्षक आहेत, काय शस्त्रे आहेत, ते जहाज नेमके कुठे चालले आहे हे कळणे अवघड असते असे म्हणाले.
व्यापारी जहाजे आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अंतर्गत काम करीत असतात. त्याप्रमाणे या तरंगत्या शस्त्रागारांनाही काही नियम व नियंत्रणे असली पाहिजेत, अशी तरंगती शस्त्रागारे असलेल्या जहाजात नेमकी किती शस्त्रे आहेत व कोण रक्षक म्हणून काम करीत आहेत हे सागर किनारी असलेल्या देशांना समजले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.