लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवारी घडवणारा चारा घोटाळा उघड करण्यात अमित खरे यांची महत्त्वाची भूमिका होती. पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात उपायुक्त म्हणून काम करत असताना अमित खरे यांनी हा घोटाळा उघड केला होता. मूळचे बिहारचे असेलेले अमित खरे हे १९८५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.

नव्वदच्या दशकात बिहारची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने राज्याच्या अर्थ खात्याने सर्व जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना विविध सरकारी खात्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. यादरम्यान, पशुसंवर्धन खात्यातील देयकांमध्ये गोंधळ असल्याचे समोर आल्याने त्या खात्यातील आर्थिक व्यवहारांकडे विशेष लक्ष दिले जात होते.

जानेवारी १९९६ मध्ये पशुसंवर्धन खात्याच्या चाईबासा कार्यालयात सलग दोन महिने ९ व १० कोटी रुपयांचे देयके अदा करण्यात आले. सलग दोन महिने एवढ्या मोठ्या रकमेचे देयके दिल्याने या व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरे आणि त्यांच्या पथकाने कार्यालयात धडक दिली असता तेथील अधिकारी आणि कर्मचारी पळून गेले. मात्र, कार्यालयात बनावट शिक्के आणि देयकपत्र सापडल्याने खरे यांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. पशुसंवर्धन विभागातील अन्य कार्यालायंमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले. यानंतर पशुसंवर्धन खात्यातील या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले.

चारा घोटाळ्यानंतर अमित खरे यांना बदलीचा त्रासही सहन करावा लागला. राज्य चर्म आयोग, बिहार सामायिक परीक्षा मंडळ या विभागांमध्ये त्यांची बदली करण्यात आली. अमित खरे यांच्या वडिलांची प्रकृती खालावली होती, यामुळे अमित खरे रजेवर होते. मात्र तडकाफडकी त्यांची रजा रद्द करण्यात आली होती. बिहारमधून त्यांची नियुक्ती केंद्रात करण्यात आली. तिथून त्यांना पुन्हा झारखंडमध्ये पाठवण्यात आले.