चहापतीचं पाकिट ५ हजार रुपयांना, केळी ३ हजार रुपये किलो, तर कॉफीचं पाकिट ७ हजार रुपये… हे दर आहेत उत्तर कोरियातील! नेहमी किम जोंग उन यांच्यामुळे चर्चेत येणारा उत्तर कोरिया सध्या अन्न टंचाईच्या संकटामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. उत्तर कोरियातील कृषी उत्पादना मोठी घसरण झाल्यानं जीवनाश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनीही हे संकट मान्य केलं आहे. कोरियातील स्थानिक वृत्तसंस्थांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

कोरियन वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियात अनेक अन्न पदार्थांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या पदार्थांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात निर्माण झालेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईबद्दलची परिस्थिती हुकूमशाह किम जोंग उन यांनीही स्वीकारली असून, त्याबद्दल भाष्यही केलं आहे. सध्या उत्तर कोरियात काही जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत. चहापतीचं पाकिट ५ हजार १९० रुपयांना, केळी ३ हजार ३०० रुपये किलो, तर कॉफीचं पाकिट ७ हजार ४१४ रुपयांना मिळत आहे.

“गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळामुळे कृषी क्षेत्राला फटका बसला. कृषी क्षेत्र अपेक्षित उत्पादन करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशातील अन्न टंचाईची परिस्थिती बिकट होत चालली आहे,” असं किम जोंग उन यांनी म्हटलं आहे. अन्न पदार्थांच्या टंचाई लवकरात लवकर सोडवण्यासाठी सूचना किम जोंग उन यांनी पक्षाच्या नेत्यांना केंद्रीय समितीच्या बैठकीत केली आहे. देशातील कृषी क्षेत्रातील उत्पादन घटल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असून, संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संस्थेच्या माहितीप्रमाणे उत्तर कोरियात सध्या मागणीच्या प्रमाणात ८ लाख ६० हजार टन अन्नाची टंचाई भेडसावत आहेत.

जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईवर उत्तर कोरिया प्रशासन कशा पद्धतीने मात करणार आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लॉकडाउनमुळे उत्तर कोरियाच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. उत्तर अनेक जीवनावश्यक वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहे. दरम्यान, या संकटातून तातडीने मार्ग काढण्यासाठी किम जोंग यांनी पक्षाचे नेते आणि प्रशासनाकडून सूचना मागवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच किम जोंग उन यांनी देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईबद्दल नागरिकांना सर्तक केलं होतं.