उत्तर प्रदेशात भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान जोरात सुरु आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपाचे सदस्य बनवताना येथील नेत्यांना कुठलेच भान राहिलेले नाही. कारण येथील भाजपा आमदार सुशील सिंह याने बुधवारी चक्क शाळकरी मुलांचीच भाजपाचे सदस्य म्हणून नोंदणी करुन घेतली.

आमदार सुशील सिंहने या विद्यार्थ्यांकडून भाजपाच्या सदस्यत्वाचे अर्ज भरून घेतले. तसेच त्यांच्या अंगावर भाजपाचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाचे चित्र असलेली भगवी वस्त्रे परिधान करायला लावली. कहर म्हणजे या विद्यार्थ्यांकडून त्याने भाजपाची प्रतिज्ञाही वदवून घेतली. या सदस्य नोंदणी कार्यक्रमासाठी आमदार सुशील सिंहने विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात संबोधीत केले आणि त्यांचे भाजपापरिवारात सहभागी झाल्याबद्दल स्वागतही केले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या वेळेमध्ये आमदार सुशील सिंहने ही भाजपा सदस्य नोंदणी मोहिम राबवली, त्यासाठी शिक्षकांना सांगून वर्गही थांबवण्यात आले होते. या प्रकराबाबत संबंधीत शाळेतील एका वरिष्ठ शिक्षकाने सांगितले की, आमदार सुशील सिंह हा या परिसरातील बाहुबली (वजनदार नेता) आहे. त्यामुळे कोणीही त्याच्या शब्दाला नकार देण्याचे धाडस करीत नाही. त्याने ज्या विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी केली आहे, ते सर्वजण अल्पवयीन आहेत. यासाठी त्याने कोणाची परवानगीही घेतली नव्हती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून ६ जुलै रोजी भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली होती. या मोहिमेंतर्गत भाजपाकडून प्रत्येक मतदारसंघात पक्षासाठी किती सदस्य नोंदणी व्हावी यासाठी नेत्यांना ठराविक टार्गेटही देण्यात आले आहेत.

शाळेतील प्रकाराबाबत बोलताना एका भाजपा नेत्याने सांगितले की, पक्ष सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. भाजपाचे इतर नेते विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्येही जाऊ शकतात आणि वेळेत त्यांना दिलेले टार्गेट पूर्ण करु शकतात.