मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरच्या याचिकेला दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे, ज्यामध्ये त्याने दिल्लीच्या बाहेरील तुरुंगात त्याला हलवलं जावं अशी मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी सुकेश हा अट्टल गुन्हेगार असून, तो कायद्याचा जराही सन्मान करत नसल्याचे सांगितले. एवढच नाहीतर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात हेदेखील सांगितले की, सुकेश चंद्रशेखरने कधी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायधीश बनून तर कधी केंद्रीय कायदे सचिव बनून अनेकांना फसवलं आणि स्वत:चा फायदा करून घेतला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली की, अंडरट्रायल दरम्यान तुरुंगात असताना सुकेश चंद्रशेखरने न्यायपालिकेस प्रभावित कऱण्यासाठी, पैसा जमा करण्यासाठी आणि हव्या असलेल्या सुखसोयी मिळवण्यासाठी कथितरित्या सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि केंद्रीय गृह आणि कायदा सचिवाच्या नावाचा वापर केलेला आहे. एवढच नाहीतर जामीन मिळवण्यासाठी सुकेशने तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायधीश असल्याचंही सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश एआर रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदीच्या खंडपीठासमोर आफल्या प्रतिज्ञापत्रात दिल्ली पोलिसांनी उघड केले की, सुकेश रोहिणी तुरुंगात असताना आपल्या खंडणी रॅकेट सुरु ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना महिन्याला दीड कोटी रुपयांची लाच देत होता.

अटक करण्यात आलेल्या सहाय्यक तुरुंग अधीक्षक धरमसिंह मीना यांच्या वक्तव्याचा दाखला देत, दिल्ली पोलिसांनी सुकेशने अधिकाऱ्यांना दर महिन्याला दिलेल्या पैशांचा तक्ताच सादर केला, ज्यामध्ये कोणाला किती रुपये दिले होते, त्याची सविस्तर माहिती होती.