आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाला पाठिंबा दिल्याने ६७ काश्मीरी विद्यार्थ्यांना मेरठ विद्यापीठाने निलंबित केले आहे. तसेच त्यांना आपली वसतीगृहेही रिकामी करण्याचे सांगण्यात आले आहे.  
विद्यापीठातून काढून टाकण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांपैकी काही मुले आता आपापल्या घरी देखील परतली आहेत.
विद्यापीठाच्या वसतीगृहातील टेलिव्हिजन हॉलमध्ये विद्यार्थी भारत-पाकिस्तान सामना पाहत होते. सामन्याच्या अखेरीस भारताचा पराभव झाल्यानंतर काश्मीरी विद्यार्थ्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर वसतीगृहात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यादरम्यान इतर विद्यार्थ्यांचे भांडणही झाल्याचे वृत्त आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला होता त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले आहे. दुसऱया गटावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
वसतीगृहाचे व्यवस्थापकीय अधिकारी जी.एस.बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरी विद्यार्थ्यांनी राष्ट्र-विरोधी भूमिका मांडल्याने त्यांना निलंबीत करण्यात आल्याचे कारण देण्यात आलेले आहे. परंतु,  पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी करणे म्हणजे देशाच्या विरोधात वक्तव्य केल्याचे होत नाही. त्यांनी राष्ट्र-विरोधी कृत्य केल्याचे म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन करणे योग्य नाही असे बन्सल इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.
यावर विद्यापीठाचे कुलगुरू मंझूर अहमद यांनी विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई सावधगिरीचा उपाय म्हणून करण्यात आल्याचे म्हटले आहे.