राम मंदिराच्या निर्मितीसाठी आता मुस्लिम समुदायातील गटांनी पुढाकार घेतला आहे. राम मंदिराच्या निर्मितीचा पुरस्कार करणारी देवा शरीफ दर्गाह संघटना आज (सोमवारी) विशेष प्रार्थना करणार आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हावी, यासाठी उत्तर प्रदेशातील बाराबांकींमध्ये मुस्लिमांकडून विशेष प्रार्थना केली जाणार आहे. श्रीराम मंदिर निर्माण मुस्लिम कारसेवक मंचाचे १५ सदस्य या प्रार्थनेवेळी उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीला गती देण्यासाठी यावेळी संतांकडून शपथ घेतली जाणार आहे.

‘अयोध्येतील रामलल्लाच्या भव्यदिव्य मंदिरासाठी ईश्वरी हस्तक्षेप व्हावा, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे,’ अशी माहिती मंचाचे अध्यक्ष मोहम्मद आझम खान यांनी दिली. ‘अयोध्येत रामाचा जन्म झाला. त्याठिकाणी राम मंदिर उभे राहिल्यास एक हजार गरिबांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करता येईल. यासोबतच सोने आणि चांदीपासून तयार केलेली चादर मशिदीतील कबरीवर चढवण्यात येईल,’ असेदेखील मोहम्मद आझम खान यांनी सांगितले.

देवा शरीफ दर्गाह लखनौपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. सुफी संत हाजी वारिस अली शाह यांचे स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे. येत्या गुरु पौर्णिमेपासून राम मंदिराच्या उभारणीला गती मिळण्याची शक्यता आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त सीतापूरमधील नारदानंद आश्रमात साधूसंत एकत्र येणार आहेत. यावेळी राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखली जाणार आहे.

‘उत्तर प्रदेशातील विविध आखाड्यांच्या संतांसोबतच शेजारील राज्यांमधील अनेक संत मंडळी गुरु पौर्णिमेनिमित्त एकत्र येणार आहेत. यावेळी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबद्दल चर्चा होणार आहे,’ अशी माहिती नारदानंद आश्रमाचे प्रमुख स्वामी चैतन्य महाराज यांनी दिली. ‘९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा आहे. या दिवसापासूनच आम्ही राम मंदिरासाठी एक मोहीम सुरु करणार आहोत. साधू संतांनीच नव्हे, तर सामान्य लोकांनीदेखील राम मंदिराच्या निर्मितीसाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात येणार आहे,’ असेदेखील स्वामी चैतन्य महाराज यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटले.

नारदानंद आश्रमाचे प्रमुख स्वामी चैतन्य महाराज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचादेखील संदर्भ दिला. २७ जून रोजी स्वामी चैतन्य महाराज यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. ‘२०१९ च्या आधीच राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल,’ असा विश्वास स्वामी चैतन्य महाराज यांनी व्यक्त केला.