काही व्यक्ती देशद्रोही असल्याची तक्रार करूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याबद्दल माजी लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना कायदेशीर नोटीस पाठविली असून, शिंदे यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.
देशाच्या सुरक्षेवर थेट परिणाम होईल इतकी गंभीर बाब असतानाही आपण कर्तव्यात कसूर केल्याने आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी का करण्यात येऊ नये, असे शिंदे यांना पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे. काही प्रसिद्धीमाध्यमांतून लष्कराच्या बंडाबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले, त्याचा संदर्भ देऊन आपण काही व्यक्तींविरुद्ध देशद्रोह आणि गोपनीयता कायद्याचा भंग केल्याच्या तक्रारी शिंदे यांच्याकडे केल्या होत्या आणि या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती, असे सिंग यांनी म्हटले आहे.
आपल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सिंग यांनी शिंदे यांना सात दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर शिंदे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सिंग यांनी लष्करातील काही अधिकारी आणि मीडियाविरुद्ध गोपनीयता आणि राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा भंग केल्याबद्दल तक्रारी केल्या आहेत.
गेल्या डिसेंबर महिन्यात सिंग यांनी शिंदे यांना यापूर्वीच्या नोटिशीबाबत स्मरणपत्र पाठविले होते. मात्र शिंदे यांच्याकडून अद्यापही नोटिशीला अथवा स्मरणपत्राला प्रतिसाद देण्यात आलेला नाही.