अरूणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पूल हे मंगळवारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह फास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. सूत्रांच्या माहितीनुसार, कालिखो पूल यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप या शक्यतेला दुजोरा देण्यात आलेला नाही.फेब्रुवारी २०१६ ते जुलै २०१६ या काळात त्यांनी अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते.   तत्कालीन मुख्यमंत्री नाबाम तुकी यांच्या गटातील १२ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कालिखो पूल मुख्यमंत्री झाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जुलैमध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
४६ वर्षीय कालिखो पूल हे अरूणाचल प्रदेशचे १८ वे मुख्यमंत्री होते. बालवयातच पालकांचे छत्र हरपल्यानंतर कालिको पूल यांना खूप संघर्ष करावा लागला. सुरूवातीच्या काळात त्यांनी सुतारकाम , फर्निचर विक्रीचे आणि रखवालदाराचे काम केले. या संघर्षमय प्रवासानंतर त्यांनी राजकीय जीवनात मोठे यश मिळवले होते. पूल यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीसपदापासून राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली. १९९५ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले आणि मंत्री झाले. आमदारकीच्या २३ वर्षांच्या काळात त्यांनी २२ वर्षे मंत्रीपद भुषविले होते.