क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. क्युबन क्रांतीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचे काल रात्री १०.२९ वाजता निधन झाल्याचे क्युबाच्या राष्ट्राध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले. फिडेल कॅस्ट्रो यांनी १९५९ ते १९७६ या काळात क्युबाचे पंतप्रधानपद तर १९७६ ते २००८ या काळात क्युबाचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले. क्युबात कम्युनिस्ट राजवटीचा एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यात फिडेल कॅस्ट्रो यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९५९ साली चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिकाधार्जिणी राजवट उलथून टाकली. त्यानंतर फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष बनले. सत्ता हाती आल्यानंतर पुढल्याच वर्षी या कॅस्ट्रो यांनी क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेनहॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर आर्थिक निर्बंध घातले आणि राजनैतिक संबंधही तोडून टाकले होते. मात्र, फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्त्वामुळेच क्युबा हा लहानसा देश बलाढ्या अमेरिकेला पुरून उरला होता.

जगभरात चर्चिल्या गेलेल्या या क्रांतीनंतर तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ फिडेल यांनी क्युबावर अधिराज्य गाजवले. २००८ साली प्रकृतीच्या कारणास्तव आपले धाकटे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्याकडे त्यांनी क्युबाची धुरा सोपवली होती. वयोमानामुळे उत्तरोउत्तर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.