सन २००६ पासून कोमामध्ये असलेले इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे अनेक महत्त्वपूर्ण अवयव गेल्या काही दिवसांपासून निकामी होत असल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली असल्याचे डॉक्टरांनी गुरुवारी येथे सांगितले.
शेरॉन यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून निकामी होत असून, त्यांच्या अवयवांचे कार्य मंदावत चालले आहे, असे शेबा वैद्यकीय केंद्राचे प्रमुख प्राध्यापक झेएव्ह रोटस्टेन यांनी सांगितले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे, असे ते म्हणाले. शेरॉन यांची मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळेच प्रकृती बिघडली असून त्यांना डायालिसीसवर ठेवण्यात आलेले नाही. परंतु कोणत्याही प्रकारचा जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टर त्यांना प्रतीजैविके देत आहेत, असे सांगण्यात आले.