Oommen Chandy Passes Away : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमान चांडी यांचं मंळवारी निधन झालं. राहुल गांधींसह ते भारत जोडो यात्रेतही सहभागी झाले होते. ओमान चांडी यांच्या नातेवाईकांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमान चांडी हे ७९ वर्षांचे होते.ओमान चांडी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बंगळुरुत उपचार सुरु होते. त्यांच्या मुलाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. २००४ ते २००६ आणि २०११ ते २०१६ या कालावधीत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं.
ओमान चांडी हे मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. २०१९ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना घशाचा आजारही जडला होता. उपचारांसाठी त्यांना जर्मनीतही नेण्यात आलं होतं. आता आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास सोशल मीडिया पोस्टद्वारे चांडी यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ओमान चांडी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मरियम्मा, चांडी ओम्मान आणि मुली मारिया व अचू असा परिवार आहे.
केरळ कांग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन यांनीही ट्वीट करत ओमान चांडी यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला. प्रेमाच्या बळावर जग जिंकणाऱ्या राजाच्या कथेचा शेवट झाला या आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. तसंच आपल्याला याबाबत खूप दुःख झालं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
ओमान चांडी हे कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्लीमधून निवडणूक लढवत असत. त्यांनी सलग १२ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. ओमान चांडी हे जनतेमध्ये लोकप्रिय असणारे नेते होते. त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यक्रमांद्वारे शेकडो लोकांच्या प्रलंबित तक्रारींचं निवारण करण्यात आलं. २०१८ मध्ये चांडी यांना AICC चं सरचिटणीस बदही देण्यात आलं होतं. तसंच २००६ ते २०११ या कालावधीत त्यांनी केरळचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं.