मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावरून (२६/११) पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्याच एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या देशाचे कृत्य जगासमोर ठेवले आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील एका दहशतवादी गटाचा हात असल्याचा खुलासा पाकचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानी यांनी केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

दिल्ली येथे अायोजित १९ व्या अशियाई सुरक्षा संमेलनात सहभागी झालेले दुर्रानी म्हणाले, मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानमधील एका दहशतवादी संघटनेचा हात होता. हा दहशतवादी हल्ला सीमेपार करण्यात आला होता. सीमापार केलेल्या हल्ल्याचा हा उत्कृष्ठ नमुना होता, असेही ते म्हणाले. जमात-उद-दवाचा दहशतवादी हाफिज सईद हा आता काही कामाचा उरलेला नाही. पाकिस्तानने त्याच्याविरोधात सक्त कारवाई केली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी पाक सरकारला या वेळी दिला.
वर्ष २००८ साली दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे भारतात येऊन मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सहभागी असलेला अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावेळी तपासात या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. पुरावे देऊनही पाकिस्तान कायम हे आरोप नाकारत आला आहे.
या संमेलनात आशियाई देशातील आजी-माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. या संमेलनात दहशतवाद हाच चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे. भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही या संमेलनात उपस्थिती होती. ते म्हणाले, भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश गेल्या काही दशकांपासून छुप्या युद्धाचे बळी ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेला दहशतवाद हा एकमेव धोका असल्याचे ते म्हणाले. अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद हनीफ अतमर यांनीही अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तान दहशतवादी अड्डे उभारत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.