Raghuram Rajan on Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला ५० टक्के आयातशुल्काचा निर्णय हा भारत – अमेरिकेच्या संबंधाला मोठा धक्का आहे. तसेच एकाच व्यापार भागीदाराबरोबरचे व्यापार अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला एक स्पष्ट इशारा असून आपण जागे झाले पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेच्या ५० टक्के आयातशुल्कामुळे भारतातील कापड, हिरे आणि मत्स्य व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्काचा निर्णय बुधवारी लागू झाला आहे. यावर बोलताना डॉ. रघुराम राजन म्हणाले की, आजच्या जागतिक व्यवस्थेत व्यापार, गुंतवणूक आणि वित्तीय विषय शस्त्र बनले आहेत, त्यामुळे भारताने काळजीपूर्वक पाऊले उचलली पाहिजेत.
आताच जागे व्हा..
इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना रघुराम राजन म्हणाले, ही एक धोक्याची घंटा आहे. आपण जागे झाले पाहिजे. आपण आता कोणत्याही एका देशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू नये. आपण पूर्वेकडे, युरोप आणि आफ्रिकेकडे पाहुया आणि अमेरिकेबरोबर पुढे जाऊया. आपण अशा सुधारणा अमलात आणुया ज्या ८ ते ८.५ टक्क्यांचा विकासदर गाठून आपल्या तरूणांच्या हाताला काम देऊ शकतील.
रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर कठोर असे आयातशुल्क लादले आहे. मात्र रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करणाऱ्या चीन, युरोप यांच्यावर मात्र ट्रम्प यांनी भारतासारखे कठोर आयातशुल्क लादलेले नाही.
तेल आयातीबाबत पुन्हा विचार करावा
राजन यांनी भारताला रशियन तेल आयतीबाबत धोरणाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. “कुणाला लाभ होतोय आणि कुणाला तोटा, याबद्दल बोलण्याची आपल्याला आवश्यकता आहे. रिफायनरीचे मालक जास्त नफा कमवत आहेत. परंतु त्याची किंमत निर्यातदार आयातशुल्काद्वारे मोजत आहेत. जर मोठा लाभ होत नसेल तर आपण तेलाची आयात सुरू ठेवावी की नाही, याचा विचार केला पाहिजे.”
चीनशी भारताची तुलना करताना राजन म्हणाले की, हा विषय निष्पक्षतेचा राहिलेला नसून भू-राजकीय बनला आहे. त्यांनी पुढे म्हटले, “आता आपण मोठ्या प्रमाणात कुणा एकावर अवलंबून राहायला नको. व्यापार आता शस्त्र बनले आहे. गुंतवणूक आणि वित्त यांचाही शस्त्रासारखा वापर होत आहे. यापुढे आपण पुरवठा आणि निर्यातीच्या बाजारपेठेत विविधता आणली पाहिजे.”
भारताने इतर पर्याय शोधावेत
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ असलेल्या रघुराम राजन यांनी म्हटले की, भारताने या संकटाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. भारताने आता चीन, जपान, अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशांशी व्यापार वाढवला पाहिजे. यापुढे कुणा एकावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. तुमच्याकडे इतर पर्याय असायला हवेत. तसेच स्वावलंबनाचाही मार्ग खुला असायला हवा.