माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडीत सुखराम यांचं निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. नातू आश्रय शर्मा यांनी मंगळवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांच्या निधनाची माहिती दिली. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना नुकतेच नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर ब्रेन स्ट्रोकचा उपचार सुरू होता. १२ मे रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पंडीत सुखराम यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता मंडी शहरातील ऐतिहासिक सेरी मंचावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर हनुमानघाट येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुखराम हे हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभेचे खासदारही होते. त्यांनी पाचवेळा विधानसभा, तर तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.२०११ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात (१९९६ मध्ये ते दळणवळण मंत्री असताना) पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. सुखराम यांचा मुलगा अनिल मंडीतून भाजपाचा आमदार आहे. सुखराम यांनी १९६३ ते १९८४ पर्यंत मंडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पशुसंवर्धन मंत्री असताना त्यांनी हिमाचल प्रदेशात जर्मनीहून गायी आणल्या होत्या, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले होते. २७ जुलै १९२७ रोजी जन्मलेल्या सुखराम १९६७-१९९७ पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. १९९७ ते १९९८ या काळात हिमाचल विकास काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९९८ च्या निवडणुकीत भाजपसोबत युती केली .२००३ मध्ये काँग्रेस घरवापसी केली. २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये सुखराम कुटुंबाने पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुखराम यांचा मुलगा सक्रिय राजकारणात आहे, तर नातू आयुष शर्मा अभिनेता आहे. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिच्याशी २०१४ साली त्याचे लग्न झाले होते.