Former Vice-President Jagdeep Dhankhar re-applies for pension as Rajasthan ex-MLA : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजस्थान विधानसभेत माजी आमदार म्हणून पेन्शनसाठी अर्ज केला आहे. धनखर हे १९९३ ते १९९८ पर्यंत किशनगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी २०२३ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान जुलै २०१९ पर्यंत ते माजी आमदार म्हणून पेन्शन घेत होते. धनखर यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ही पेन्शन थांबवण्यात आली होती . दरम्यान २१ जुलै रोजी पायउतार उपराष्ट्रपती पद सोडल्यानंतर धनखड यांनी माजी आमदार म्हणून पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी राजस्थान विधानसभेच्या सचिवालयात अर्ज केला आहे.

माजी खासदार असलेल्या धनखड यांना त्यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा स्वीकारला गेला त्या तारखेपासून पेन्शन मिळेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकवेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीला पेन्शन म्हणून ३५,००० रुपये प्रति महिना मिळतात, ही रक्कम अतिरिक्त टर्म आणि वयानुसार हळूहळू वाढत जाते. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

धनखड यांच्याप्रमाणे वयाची सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींना त्यांच्या पेन्शनमध्ये २० टक्के वाढ मिळते. माजी आमदार म्हणून धनखड यांना दरमहा ४२,००० रुपये पेन्शन मिळेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी संसद सदस्य म्हणून त्यांना मिळणाऱ्या पेन्शनव्यतिरिक्त ही रक्कम असणार आहे.

दरम्यान धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून ते त्यांच्या कुटुंबाबरोबर सार्वजनिक जीवनापासून दूर राहिले आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या आरोग्याचे कारण दिले आहे.