पाटण्यातील साखळी बॉम्बस्फोटानंतर इंडियन मुजाहिदीनचे चार दहशतवादी पुढे पंधरा दिवस रायपूरमध्ये राहिले होते. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर १५ नोव्हेंबर रोजी या दहशतवाद्यांनी रायपूरमधून पलायन केल्याची माहिती छत्तीसगढ पोलीसांनी दिली.
छत्तीसगढमध्ये इंडियन मुजाहिदीनशी संबंधित सात जणांना पोलीसांनी गेल्या काही दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांना इंडियन मुजाहिदीच्या दहशतवाद्यांच्या मुक्कामाबद्दल समजले.
पाटण्यातील साखळी स्फोटांमागील इंडियन मुजाहिदीनचे संशयित हैदर अली ऊर्फ अब्दुल्ला, नुमन अन्सारी, तौफीक अन्सारी आणि मोजीबुल्ला हे सर्वजण १५ दिवसांसाठी रायपूरमध्ये राहिले होते, असे गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश गुप्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि बिहार पोलीसांनीदेखील या चौघाजणांची ओळख पटली आहे.
इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असल्याच्या संशयावरून छत्तीसगढ पोलीसांनी उमर सिद्दीकी, अझिजुल्ला, अब्दुल वाहिद, मोहंमद अजिझ, रोशन, राजू गराजे आणि हबिबुल्ला यांना अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून पोलीस या सर्वांवर लक्ष ठेवून होते. बंदी घालण्यात आलेल्या सिमी संघटनेच्या काही कार्यक्रमांमध्ये या सर्वांचा सहभाग होता. त्यावरून पोलीसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती.