scorecardresearch

अमृतपालला फरार होण्यास मदत, चौघांना अटक; मोटारीसह रायफल, तलवारी, संपर्क यंत्रणा जप्त

खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांनी मंगळवारी दिली.

Amritpal Singh
अमृतपाल सिंग

पीटीआय, चंडीगड

खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांनी मंगळवारी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की, या चौघांनी अमृतपालला मोटारीतून पळून जाण्यास मदत केली. अमृतपालने जालंधरच्या नंगल अंबियन गावात गुरुद्वारात आश्रय घेतल्याचे या चौकशीत उघड झाले.

पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी पत्रकारांना सांगितले की, तेथे त्याने आपले कपडे बदलले. शर्ट-पॅंट घालून इतर तिघांसह तो दोन दुचाकींवर पळून गेला. शनिवारी पोलिसांनी अमृतपाल व त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेवर कारवाई सुरू केली, तेव्हा अमृतपाल आपले वाहन बदलून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीत सिंग ऊर्फ मन्ना, गुरदीप सिंग उर्फ दीपा, हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग उर्फ भेजा यांना अटक करण्यात आल्याचे गिल यांनी सांगितले. संबंधित मोटार जप्त करण्यात आली असून, त्यात ‘३१५ बोअर रायफल’, काही तलवारी आणि एक ‘वॉकीटॉकी’ संचही सापडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अमृतपाल सिंगची वेगवेगळय़ा पोशाखातील चार छायाचित्रेही प्रसिद्ध केली व नागरिकांना त्याचा शोधासाठी मदत करण्याचे आवाहन केले. गिल यांनी सांगितले, की अमृतपाल सिंगला पकडण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पोलीस अधिकाऱ्यांकडून नियमित माहिती घेत आहेत.

शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई : मान
चंडीगड : खलिस्तान समर्थक फुटीरतावादी अमृतपाल सिंगविरुद्ध कारवाई सुरू केल्यानंतर काही दिवसांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर प्रतिक्रिया देताना मंगळवारी सांगितले की, विदेशी शक्तींच्या मदतीने पंजाबची शांतता संपवण्याचा व चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पंजाबची शांतता, सौहार्द व देशाच्या प्रगतीला आपले सर्वोच्च प्राधान्य असून, राज्यातील सौहार्दपूर्ण वातावरण कोणालाही बिघडवू देणार नाही. अमृतपाल सिंग व त्याची संघटना ‘वारिस पंजाब दे’चा संदर्भ देत मान म्हणाले, की संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावली जाईल. ‘आप’ हा प्रामाणिक व देशभक्त पक्ष आहे. या कारवाईस सहकार्य केल्याबद्दल मी तीन कोटी पंजाबवासीयांचेही आभार मानतो. पंजाबमध्ये कुठेही कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचे वृत्त नाही.

काही जिल्हे वगळता पंजाबमध्ये इंटरनेट पूर्ववत
चंडीगड : पंजाब सरकारने मंगळवारी तरनतारन, फिरोजपूर, मोगा, संगरूर आणि अमृतसरच्या अजनाला उपविभाग आणि मोहालीमधील काही भागात स्थगित केलेल्या मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवांची स्थगिती गुरुवारी दुपापर्यंत वाढवली. मंगळवार दुपारपासून पंजाबच्या इतर भागातून हे निर्बंध उठवले जातील, असे गृह आणि न्याय विभागाने एका आदेशात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 01:02 IST

संबंधित बातम्या