गेल्या वर्षी दाब्रा येथे झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघा जणांना येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मधू खन्ना यांनी हा निकाल दिला.
१६ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पवन, विकास, बलजित आणि राज कुमार यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली. या घटनेनंतर बलात्काराची व्हिडीयो फिल्म काढून तिचे सर्वत्र वितरण करण्यात येईल, अशीही धमकी या आरोपींनी मुलीला दिली होती. नंतर तिने ही बाब आपल्या पालकांना सांगितली. मात्र या घटनेचा धक्का सहन न होऊन सदर मुलीने १८ सप्टेंबर रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.
बलात्कार करणारे सर्व आरोपी दाब्रा गावचेच रहिवासी आहेत. या शिक्षेखेरीज या चौघांना न्यायालयाने प्रत्येकी २७ हजार रुपयांचा दंडही केला असून त्यामधील एक लाख रुपये सदर मुलीच्या निकटवर्तीयांना आर्थिक साहाय्य म्हणून द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. याच प्रकरणी अन्य चौघांना न्यायालयाने सोडून दिले आहे.