भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमधून सैन्य माघारीबाबत लष्करी कमांडर पातळीवर चर्चेची चौथी फेरी मंगळवारी झाली. पँगॉग त्सो व देपसांग यासह संघर्षांच्या ठिकाणाहून दोन्ही देशांनी कालबद्ध रितीने सैन्य माघारी घेणे तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक तैनात केलेले मोठय़ा प्रमाणातील सैन्य व आघाडीवरील चौक्यांमध्ये ठेवलेली शस्त्रास्त्रे व इतर तैनात सामुग्री माघारी घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

लेफ्टनंट जनरल पातळीवरची ही चौथ्या फेरीची चर्चा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला असलेल्या चुशूल येथे झाली. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह यांनी केले. ते लेह येथील चौदाव्या कोअरचे प्रमुख आहेत. चीनच्या बाजूने दक्षिण शिनिजियांग लष्करी भागाचे कमांडर लिउ लिन यांनी नेतृत्व केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही बैठक सुरू झाली.

उच्चस्तरीय बैठकीचा मुख्य केंद्र बिंदू हा देपसांग, पँगॉग त्सो येथून सैन्य माघारी हा होता. भारतीय बाजून ५ मे पूर्वी लडाखमध्ये होती तशी परिस्थिती निर्माण करण्याचा आग्रह धरण्यात आला. ५ मे रोजी भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये पँगाँग त्सो येथे  पहिली धुमश्चक्री झाली होती. त्यानंतर पंधरा जूनला गलवान भागात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते.

संघर्ष क्षेत्रातून सैन्य माघारीच्या पहिल्या टप्प्यानंतर मंगळवारी चर्चा झाली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गोग्रा, हॉट स्प्रिंग व गलवान खोरे भागातून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पँगॉग त्सो भागातील फिंगर फोर भागातून भारताने मागणी केल्यानुसार सैन्य माघारी घेण्यात आले. दोन्ही देशांनी मान्य केलेल्या निर्णयानुसार सर्व संघर्ष ठिकाणांजवळ तीन किलोमीटरचे राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहे. ६ जूनला सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात तणाव कमी करण्यासाठी चर्चा झाली. दोन्ही देशात लेफ्टनंट जनरल पातळीवर चर्चेच्या तीन फेऱ्या आधीच झाल्या आहेत.