विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया पदावरून बाजूला गेल्यापासून सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी आजपासून (दि.१७ एप्रिल) बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली आहे.

तोगडिया म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते की, एकदा आम्हाला (संघ परिवार) संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करण्यात येईल. परिषदेने लोकांना अयोध्येत कार सेवा करताना प्राण पणाला लावण्याचे आवाहन केले होते. सुमारे ६० लोकांनी आपले प्राण त्यासाठी गमावले होते. गुजरातमधील हजारो लोकांनी यासाठी आपले योगदान दिले होते. या मागणीसाठी मंगळवारपासून मी बेमुदत उपोषण करणार आहे, असे ते म्हणाले.

सीमेवर सैनिक सुरक्षित नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आमच्या मुली आमच्या घरातच सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान विदेश दौऱ्यावर आहेत, अशी टीका त्यांनी मोदींवर केली. दरम्यान, तोगडिया यांनी ३२ वर्षे विहिंपचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. विहिंपच्या नव्या कार्यकारिणीत तोगडिया समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही.

तोगडिया यांनी विहिंपचे नवे अध्यक्ष एस. कोकजे यांनाही उपोषणात सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. कोकजे यांनी उपोषणात सहभाग नोंदवावा आणि संसदेत राम मंदिर निर्मितीसाठी विधेयक आणले जावे, यासाठी दबाव आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.