भारताच्या पेट्रोलिंग पॉईंटवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून टेहळणी चौकी उभारण्याचे काम सुरु होते. त्यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्याने १५ जूनच्या संध्याकाळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या चौकीमुळे चीनला काराकोरममधील भारतीय सैन्य तुकडयांच्या हालचालीवरच लक्ष ठेवण्याबरोबरच दारबूक-श्योक आणि दौलत बेग ओल्डीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या भारतीय सैन्याच्या वाहनांना सुद्धा लक्ष्य करता येणार होते.

महत्वाचं म्हणजे नियंत्रण रेषेवर भारताच्या हद्दीमध्ये ही पोस्ट उभारण्यात येत होती. म्हणून त्यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला. ‘गलवाण खोऱ्यामध्ये जे घडलं, ते सर्व पूर्वनियोजित होतं, तुम्ही हे ठरवून केलं’ असं जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं.

भारतीय लष्कराने १९७८ साली पॉईंट १४ ची स्थापना केली. याच पॉईंट १४ वरुन श्योक नदीला मिळणाऱ्या गलवान नदी, गलवान खोऱ्यावर लक्ष ठेवता येते. याच श्योक नदीच्या किनाऱ्याजवळ भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सकडून डीएसबीओ रस्ता बांधणीचे काम सुरु आहे.

सहा जूनला दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये बैठक झाली. त्यामध्ये पॉईंट १४ च्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक पॉईंटवर किती सैन्य हवं हे दोन्ही देशांमध्ये ठरलं होतं. तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना चीनला पॉईंट १४ जवळ टेहळणी चौकी उभारायची होती. त्यावर १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांनी आक्षेप घेतला.

त्या बेकायद चौकीमुळे भारताची पॉईंट १४ जवळ अजून बिकट अवस्था झाली असती. तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली थेट नियंत्रण रेषाच बदलण्याचा चीनचा प्रयत्न होता. यामुळे चीनला काराकोरमधील भारतीय सैन्याच्या हालचालींबरोबर थेट सैन्य वाहनांना लक्ष्य करता येणं सुद्धा शक्य होतं.

१५ जून रोजी संध्याकाळी कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या सैनिकांनी चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांना पॉईंट १४ जवळ उभारलेली चौकी हटवायला सांगितली. त्यानंतर तिथे संघर्षाला सुरुवात झाली. चिनी सैन्याने तिथे चौकी उभारुन नियंत्रण रेषा बदलण्याचा कट रचला होता. कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिम्मत आणि धाडसं दाखवून चीनला ती चौकी उभी करण्यापासून रोखले.