पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. पंजाबी लोकांना बदनाम करण्यासाठी राहुल गांधी सुनियोजितपणे कट रचत असल्याचा आरोप करून शीख बांधवांचा द्वेष करण्याची गांधी घराण्याचा परंपरा अजून संपलेली नाही, असे वक्तव्य बादल यांनी केले.
पंजाबमधील एका आंदोलनामध्ये भाषण करताना बादल म्हणाले, काही वर्षांपूर्वी पंजाबी लोकांना दहशतवादी समजले जायचे. माझे वडील बादल साहीब यांना कोईम्बतूरमधील तुरुंगात ठेवले होते, हे मला आजही आठवते आहे. त्यावेळी मला आणि माझ्या आईला टॅक्सी आणि रिक्षांमध्ये बसू दिले जायचे नाही. दहशतवादी असा आमच्या आरोप करण्यात यायचा. खरंच आम्ही दहशतवादी आहोत का?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
पंजाबमधील ७० टक्के तरूण अमली पदार्थांच्या विळख्यात असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले, त्यावेळीच त्यांनी शीखांविरोधात कट रचल्याचे उघड झाले, असा आरोप करून बादल म्हणाले, माध्यमांनी तो विषय सातत्याने लावून धरीत सर्वच पंजाबी व्यसनाधीन असल्यासारखे वातावरण निर्माण केले.