गणपतीची प्रतिमा असलेले पहिले चलनी नाणे जर्मनीत तयार करण्यात आले असून ते पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट या देशाच्या सरकारने जारी केले आहे. ही नाणी भारतातील नाणेसंग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. जर्मनीच्या मेयर टांकसाळीने शुद्ध चांदीत ही नाणी तयार केली असून त्यात पिंपळाच्या पानावर गणेशाची रंगीत प्रतिमा आहे. ‘वक्रतुंड महाकाय’ हा संस्कृत श्लोकही त्यात कोरलेला आहे. ही नाणी विशेष करून संग्राहकांसाठी आहेत. प्रत्येक नाण्याचे वजन हे २५ ग्रॅम असून त्याला स्वारोव्हस्की स्फटिकही लावलेले आहेत. प्रत्येक नाण्याची किंमत रु. ८००१ इतकी असून ही नाणी ९ सप्टेंबरला गणेशचतुर्थीच्या दिवशी मागणी केलेल्या संकलकांना दिली जाणार आहेत. आतापर्यंत कुठल्याही सरकारने गणपतीची प्रतिमा असलेली नाणी जारी केली नव्हती, त्यामुळे त्यांचे महत्त्व आहे. नाणेतज्ज्ञ आलोक गोयल यांनी सांगितले, की भारतात गणपतीची प्रतिमा असलेल्या नाण्यांना मोठी मागणी आहे परंतु भारतीय टांकसाळी या धार्मिक व्यक्तिचित्रांवर आधारित नाणी काढत नाहीत. आपल्याकडे गणपतीचे चित्र असलेले नाणी सरकारी पातळीवर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष वापर न केले जाणारे पण चलनी नाणे असलेले हे नाणे वेगळेच आहे.
कोलकाता येथील ‘एजी इम्पेक्स’ या आस्थापनाला या नाण्यांची विक्री करण्याचे आंतरराष्ट्रीय अधिकार मिळाले असून आजपासून त्यांनी या नाण्यांसाठी ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली आहे.
या नाण्यांना खास पेटी असेल. तिचा आकार गणपतीचे वाहन असलेल्या उंदरासारखा असेल. आयव्हरी कोस्टचे प्रतीकचिन्ह असलेले हत्तीचे मुख एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गणेशाची प्रतिमा असेल, त्यामुळे हे नाणे  वेगळे आहे, असे गोयल यांचे मत आहे.