मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन शॉपिंसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉनवरून चक्क गांजाची तस्करी करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच, अटक केलेल्या दोन आरोपींकडून २० किलो अमली पदार्थ देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भिंदचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

” अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून गांजाची तस्करी करण्यात आली आहे. विशाखापट्ट्णमहून गांजा घेऊन मध्यप्रदेशातील विविध ठिकाणी दोन-दोन किलो गांजा पाठवला जात होता. कल्लू नावाच्या एकास अटक करण्यात आली आहे, भिंद येथील गोविंद धाबा येथून त्याला अटक करण्यात आली आहे आणि पिंटू नावाचा जो धाब्याचा मालक आहे, त्याच्या नावाने देकील अ‍ॅमेझॉनचं पार्सल आलं होतं. याशिवाय त्यांचा सहकारी जो हरिद्वार येथे आहे मुकेश जैस्वाल त्याला देखील तेथील पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे.” अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी दिली आहे.

तसेच, ”प्राथमिक चौकशीत कल्लूने हे सांगितलं आहे की, त्याने चार महिन्यात जवळपास १ टन गांजाची तस्करी अ‍ॅमेझॉनवरून केली आणि प्रत्येक मालाच्यावेळी अ‍ॅमेझॉनकडून ६७ टक्के पैशांची वसूली केली जात होती. यावर आम्ही अ‍ॅमेझॉन कंपनीशी बोललो आहोत, त्यांना याबाबत माहिती दिली गेली आहे की जो बाबू टेक्स नावाची जी कंपनी आहे, जिची माहिती काढल्यावर असं समजलं आहे की ही गुजरातमधील सुरतची कंपनी आहे. जी टेक्स्टाईलशी संबंधित आहे आणि टेक्स्टाईल कंपनीद्वारे हर्बल उत्पादने किंवा गांजाची विक्री कशी काय केली जात होती, अ‍ॅमेझॉनकडून त्याची चौकशी का केली गेली नाही. याबाबत त्यांच्याकडून माहिती मागवली गेली आहे. जर यामध्ये त्यांचा सहभाग आढळून येत असेल तर त्यांच्याविरोधता देखील कारवाई केली जाईल. यापुढे आम्ही याबाबत विशेष मोहीम राबवू व सरकारला देखील याबाबत माहिती देऊ. ईडीला देखील कळवलं जाईल.” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

तर, ”विक्रेत्यांकडून कुठल्या गोष्टींचे अनुपालन झाले नाही की कसे याची आम्ही चौकशी करत आहोत. चौकशी अधिकारी व कायदा अमलबजावणी संस्थांना आम्ही सध्या सुरू असलेल्या चौकशीत सहकार्य करू.” असे अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganja consignments being smuggled via amazon msr
First published on: 15-11-2021 at 21:52 IST