गेल्या काही वर्षात भारतीय उद्योग क्षेत्रात अदानी समुहाच्या उद्योगाचा पसारा वाढत चालला आहे. अगदी विमानतळापासून बंदरांपर्यंत आणि वीजनिर्मितीपासून ते वीज वितरणापर्यंत अनेक व्यवसाय सध्या अदानी समूहाकडे एकवटले आहेत. याच अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी काही दिवसांपूर्वी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. यानंतर आता गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांनी वॉल स्ट्रीटचे गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, सोमवारी गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती १२३.२ अब्ज डॉलर इतकी नोंदली आहे. तर वॉरेन बफेट यांची संपत्ती १२१.७ अब्ज डॉलर इतकी आहे. फोर्ब्सने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी गौतम अदानींनी वॉरेन बफेटला मागे टाकलं आहे.

फोर्ब्सच्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, स्पेसएक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २६९.७ अब्ज डॉलर इतकी आहे. मस्कनंतर दुसऱ्या क्रमांकावर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१७०.२ अब्ज डॉलर) आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे LVMHचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट (१६६.८ अब्ज डॉलर) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (१३०.२ अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागतो. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आठव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती १०४.२ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०५० नंतर कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही- गौतम अदानी
उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत एक अंदाज व्यक्त केला आहे. देशानं २०५० पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सचं लक्ष्य गाठलं तर या देशात कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही, असं उद्योगपती गौतम अदानी यांनी म्हटलं. त्यांनी इकोनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये हे वक्तव्य केलं. “आपण २०५० पासून सुमारे १० हजार दिवस दूर आहोत. या काळात आपण आपल्या अर्थव्यवस्थेत २५ ट्रिलियन डॉलर्सची भर घालू असं मला वाटतं. याचा अर्थ जीडीपीमध्ये दररोज २.५ अब्ज डॉलर्सची भर पडेल. या काळात आपण सर्व प्रकारची गरिबी दूर करू.” असं गौतम अदानी यांनी म्हटलं.