पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला मोठा भाऊ संबोधल्यामुळे भाजपा खासदार गौतम गंभीर चांगलेच संतापले आहेत. असे वक्तव्य करण्यापूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मुलांना सीमेवर पाठवावे, अस म्हणत गौतम गंभीर यांनी सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपा खासदार गौतम गंभीर म्हणाले की, भारत ७० वर्षांपासून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाशी लढत आहे आणि सिद्धू दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना आपला मोठा भाऊ म्हणत आहेत हे लज्जास्पद आहे. ट्विटरवर गंभीर यांनी सिद्धू यांना उद्देशून लिहिले की, ”आधी तुमच्या मुलाला किंवा मुलीला सीमेवर पाठवा आणि नंतर दहशतवादी देशाच्या प्रमुखाला तुमचा मोठा भाऊ म्हणा.”

शनिवारी पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोठे भाऊ असे वर्णन केले होते. पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर करतारपूर कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटचे सीईओ मोहम्मद लतीफ यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांचे स्वागत केले. त्याचवेळी, त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्यावतीने नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे अभिनंदन केले, ज्यावर सिद्धू यांनी इमरान खानचे कौतुक केले आणि त्यांना आपला मोठा भाऊ म्हटले होते.