प्रत्येक संकटाचा सामना करण्यास लष्कर सज्ज असून, यावर्षी जम्मू – काश्मीरमध्ये १४१ दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती निवृत्त लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी दिली. लष्करप्रमुखपदी त्यांचा आजचा शेवटचा दिवस होता. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. २०१२ मध्ये ६७ दहशतवादी, तर २०१३ मध्ये ६५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, असेही ते यावेळी म्हणाले.

जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी निवृत्त होण्यापूर्वी आज, शनिवारी अमर जवान ज्योती येथे शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांना साऊथ ब्लॉक येथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लष्करप्रमुखपदाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. ४३ वर्षे देशाची सेवा केल्यानंतर आज निवृत्त होत आहे. मी अडीच वर्षे लष्करप्रमुख पदावर होतो. लष्कर प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास मी देशवासियांना देऊ इच्छित आहे, असे ते यावेळी म्हणाले.

देशासाठी बलिदान दिलेल्यांना मी सलाम करतो, असे सांगून त्यांनी वन रॅंक वन पेन्शन लागू केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका चोख बजावली असून, लष्कराचे मनोबल वाढवण्यास मदतच केली आहे, असे कौतुक त्यांनी केले. त्यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही प्रत्येक संकटाचा सामना करण्यास सज्ज आहोत असे सांगून दहशतवादविरोधी कारवायांबद्दल माहिती दिली. २०१२ मध्ये ६७ दहशतवाद्यांना ठार केले. २०१३ मध्ये ६५ आणि यावर्षी म्हणजेच २०१६ मध्ये १४१ दहशतावाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले. सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी लष्कराला कारवाया करताना मोकळीक दिल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, निवृत्त लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांच्याकडून आज लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.