किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील व्यवहार  सर्वासाठीच ज्यामुळे सोपे झाले, त्या बारकोडचे सहसंशोधक व अमेरिकी अभियंता  जॉर्ज लॉरर (वय ९४) यांचे  उत्तर कॅरोलिनातील वेंडेल येथील निवास्थानी गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बहुतेक वस्तूंवर जी काळ्या रेघांची पट्टी दिसते त्याला बारकोड असे म्हणतात. तो १२ अंकांचा एक सांकेतांक असतो ज्यावरून ते उत्पादन ओळखता येते. आज जगात विक्रीसाठी असलेल्या बहुतांश वस्तूंवर बारकोड लावलेला असतो. आयबीएम कंपनीत काम करीत असताना जॉजॅ लॉरर यांनी युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजे बारकोड विकसित केले होते. हा बारकोड वाचण्यासाठी लागणारा स्कॅनरही त्यांनी विकसित केला. या बारकोडमध्ये आधी टिंबांचा समावेश होता त्याऐवजी लॉरर यांनी पट्टय़ांचा समावेश केला. बारकोडमुळे उद्योग जगतात मोठी क्रांती घडून आली असे आयबीएमच्या संकेतस्थळावर त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत म्हटले आहे. या बारकोडमध्ये किमतीचाही समावेश असल्याने किंमत लावताना होणाऱ्या चुका कमी होऊन हिशेबही सोपे झाले.  पहिले बारकोड ओहिओ येथे जून १९७४ मध्ये रिंगलेच्या फ्रूट च्युइंग गमवर लावण्यात आला होता.   आयबीएममधील लॉरर यांचे  सहकारी कर्मचारी नॉर्मन  वूडलँड हे बारकोडचे मूळ संशोधक मानले जातात. त्यांनी मोर्सकोडवर आधारित बार कोड तयार केला होता. त्यासाठी त्यांनी १९५० मध्ये पेटंट घेतले पण ते पुढे जाऊ शकले नाहीत. काही वर्षांनी लॉरर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली.