दिल्लीतील उबेर टॅक्सीत एका महिलेवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता गोव्यातील काणकोण तालुक्यात एका स्थानिक रिक्षावाल्याने बावीस वर्षे वयाच्या जर्मनीच्या  महिलेचा विनयभंग केला. आरोपी चेतन नामशिकर याला महिलेने तक्रार दिल्यानंतर शुक्रवारी अटक करण्यात आली.
६ डिसेंबरला हा गुन्हा घडला असून ही महिला काणकोण तालुक्यातील बंदरावर एका पार्टीला गेली होती. तेथून परत येत असताना तिचा रिक्षावाल्याने विनयभंग केला असे पोलीस निरीक्षक गुरूदास कदम यांनी सांगितले.
तक्रारीत म्हटले आहे की, तिने हॉटेलकडे परत जाण्यासाठी रिक्षा भाडय़ाने ठरवली पण आरोपीने वाहन निर्जन ठिकाणी नेऊन आपला विनयभंग केला. कदम यांनी सांगितले की, सदर महिला आरोपीच्या तावडीतून सुटली व पळाली. नंतर पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली व त्याच्यावर भादंवि कलमानुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदवला.