बर्लिन :  जर्मन संसदेच्या निवडणुकांच्या मतदानोत्तर चाचणीत (एक्झिट पोल) सोशल डेमॉक्रॅट्स या मध्यममार्गी- डाव्या पक्षाने मावळत्या चान्सलर अँगेला मर्केल यांच्या युनियन ब्लॉक पक्षाला अटीतटीची लढत दिली असल्याचे संकेत मिळत आहेत. गेली १६ वर्षे सत्तेत राहिलेल्या मर्केल यांचा उत्तराधिकारी कोण, याचे उत्तर या निवडणुकीच्या निकालांतून मिळणार आहे.

एआरडी पब्लिक टेलिव्हिजनसाठी घेण्यात आलेल्या मतदानोत्तर चाचणीत सोशल डेमॉक्रॅट्स आणि मर्केल यांच्या मध्यम- उजव्या युनियन ब्लॉकला प्रत्येकी २५ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. सोशल डेमॉक्रॅट्सतर्फे मावळते व्हाइस चान्सलर ओलाफ शूल्झ हे चान्सलरपदासाठी लढत असून, ब्लॉकचे नेतृत्व आर्मिन लाशेट हे करत आहेत.

झेडडीएफ पब्लिक टेलिव्हिजनच्या मतदानोत्तर चाचणीत सोशल डेमॉक्रॅट्सच्या बाजूने २६ टक्के, तर ब्लॉकच्या बाजूने २४ टक्के मते पडली आहेत. दोन्ही चाचण्यांत पर्यावरणवादी ग्रीन्स हा १५ टक्के मतदारांच्या पाठिंब्याने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीत यापुढचे आघाडी सरकार स्थापन करणे ही वेळखाऊ व गुंतागुंतीची प्रक्रिया ठरणार आहे.