बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाला टिपू सुलतानचे नाव देण्यात यावे, असे वक्तव्य करणाऱया ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जर केम्पेगौडा यांच्याऐवजी टिपू सुलतानचे नाव देण्याची भाषा करून गिरीश कर्नाड यांनी कानडी नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांचीही कलबुर्गी यांच्यासारखी अवस्था होईल, अशी धमकी कर्नाड यांना ट्विटरवरून देण्यात आली आहे. 'इनटॉलरेंट चंद्रा'या ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट करण्यात आले होते. कर्नाड यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कर्नाड यांच्या विधानावर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाल्यानंतर त्यांनी बुधवारी जाहीर माफी देखील मागितली. असे विधान करून मला काय फायदा मिळणार आहे. या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची जाहीर माफी मागतो, असे कर्नाड म्हणाले. मी फक्त व्यक्तिगत व्यक्त केले होते. त्यात कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे कर्नाड यांनी सांगितले.