थायलंडमधील सरकारविरोधी मेळाव्यांत हिंसाचार होऊन त्यामध्ये पाच वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला, तर अन्य ६० जण जखमी झाले. या मेळाव्यांत बंदूकधारी इसमांनी आंदोलकांच्या दिशेने हातबॉम्ब फेकत त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबारही केल्याचे पोलिसांनी सांगितले.
बँकॉकच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी केंद्राजवळ आयोजित करण्यात आलेल्या सरकारविरोधी मेळाव्यात स्फोट घडवून आणण्यात आला. त्या वेळी तीन मुलांसह २४ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक रिफॉम्र्स कमिटी’ या सरकारविरोधी संघटनेच्या रक्षकांनी एका रिक्षाचालकास बॉम्बस्फोट घडविल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे.
बँकॉकच्या पूर्वेकडील ट्राट प्रांतात शनिवारी रात्री सरकारविरोधकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यावर वाहनातून करण्यात आलेल्या गोळीबारात सुमारे ३४ जण जखमी झाले. पंतप्रधान यिंग्लूक शिनावात्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी हा मेळावा आयोजित केला होता.