बस, रिक्षा आणि आता चक्क मेट्रोसुद्धा महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. कोलकाता मेट्रोमध्ये एका खासगी शिकवणी चालविणाऱया शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी मेट्रोमधून प्रवास करत होती. त्याच डब्यात सुरेंद्र धवन हा व्यक्तीसुद्धा प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विद्यार्थिनीने आरडाओरड केल्याने मेट्रोतील इतर प्रवासी धावून आले आणि प्रसंगावधान बाळगून प्रवाशांनी धवनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, धवन मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान तिच्याशी शाररिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. यावर राग व्यक्त करताच धवनने हसून विद्यार्थिनीला रागाची पर्वा करत नसल्याचे दाखविले. यावर धवन मुद्दाम जवळीत साधत असल्याचे तिच्या लक्षात आले. धवनच्या वाढत्या हरकती पाहून विद्यार्थिनीने मेट्रोतील सूचक बेल दाबली आणि प्रवाशांनी सुरेंद्र धवनला पकडून महात्मा गांधी रोड स्टेशनवरील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
खिशातून पाकिट काढत असताना मेट्रोचा वेग अचानक वाढल्यामुळे विद्यार्थिनीला धक्का बसला. माझा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नव्हता असे धवनने पोलिसांना सांगितले आहे. डब्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरी माहिती पुढे येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.