उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या महत्वाकांक्षी ‘मोफत लॅपटॉप’ वितरण योजनेच्या फैज़ाबाद येथील समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या एका १८ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही मुलगी फैज़ाबादाहून जवळपास १०० किलोमीटर दूर कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा हाय-प्रोफाइल लोकसभा मतदारसंघ अमेठी येथे राहणारी आहे.
सदर पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत दुपारी २ वाजता कार्यक्रमस्थळी पोहचली होती. परंतू लॅपटॉपचे वाटप करण्यासाठी राज्याचे मंत्री अवधेश प्रसाद सायंकाळी सात वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि कार्यक्रम रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. सरकार आणि महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या मुलींनी घरी पोहोचण्यासाठी एक जीप भाड्याने घेतली होती. परतीच्या प्रवासादरम्यान सर्व मुलींना उतरवल्यानंतर पीडित मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला रस्त्यावर सोडून तेथून पळ काढला. दरम्यान, जीप चालकाला पोलिसांतर्फे अटक करण्यात आली आहे.