मुलींसोबत गैरवर्तन करणे, त्यांची छेड काढणे तसेच कमेंटस् पास करण्यासारख्या घटना आजूबाजूला सर्रासपणे होताना नजरेस पडतात. पोलीसांकडून कारवाईचा दांडा उगारला जात असला तरी अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. काही प्रकरणांमध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा आणि कारवाईत केली जाणारी दिरंगाईदेखील समोर येते. लखनऊमध्ये घडलेल्या अशाच एका प्रकारात छेडछाडीने त्रस्त झालेल्या तरुणीने रोडरोमिओंना चांगली अद्दल घडविण्याचा निर्णय केला. भररस्त्यात तिने रोडरोमिओंना पोलिसांच्याच दांडूक्याने चांगले झोडपून काढले. लखनऊ येथील गौतम पाली पोलीस स्थानकाजवळ रविवारी ही घटना घडली. दुचाकीवर स्वार झालेली काही टपोरी मुले येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेड काढत होती. पहिल्यांदा मुलींनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी काहीही न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने त्या मुलींमधील एक मुलगी चांगलीच संतापली. राग अनावर झालेल्या त्या मुलीने पोलिसांची लाठी खेचून घेतली आणि रोडरोमिओंना यथेच्छ तुडविण्यास सुरुवात केली. तिने शिकविलेली अद्दल त्यांच्या चांगलीच लक्षात राहिल.

या सर्व प्रकाराचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. तरुणी हातातील लाठीने रोडरोमिओंची धुलाई करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. दरम्यान एक व्यक्ती तिच्या हातातून लाठी खेचून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु, सडकछाप मुलांच्या गैरवर्तनामुळे त्रस्त झालेली ती मुलगी रोडरोमिओंना प्रसाद देण्यापासून मागे हटत नाही. चांगलीच अद्दल घडलेले ते तरुण शेवटी माफी मागतात. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी लोकांची रस्त्यावर चांगलीच गर्दी जमलेली व्हिडिओमध्ये दिसून येते.