जम्मू-काश्मीरचे शेवटचे डोग्रा शासक महाराजा हरि सिंह यांना भारतरत्नने गौरविण्यात यावे तसेच त्यांच्या जन्मदिनी जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात यावी अशी मागणी त्यांचे वंशज आणि काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

“महाराजा हरि सिंह यांनी जम्मू-काश्मीरला भारतात विलीन करण्यासाठी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी ‘डॉक्युमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑफ अॅक्सेशन’वर सही केली होती. त्यामुळे आज जम्मू-काश्मीर भारताचा भाग झाला आहे, त्यामुळे महाराजा हरि सिंह यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे,” अशी मागणी महाराजा हरि सिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली. तत्पूर्वी महाराजा हरि सिंह यांच्या जन्मदिनी २३ सप्टेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी घोषीत करावी अशी मागणी, राजा हरि सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करण सिंह यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांच्याकडे केली होती.

जम्मू आणि काश्मीरचे माजी सरदार-ए-रियासत करण सिंह यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “काही वर्षांपूर्वी माझ्या दोन्ही मुलांनी जम्मू-काश्मीरच्या विधानपरिषदेत महाराजा हरि सिंह यांचा जन्मदिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषीत करावा याबाबत ठराव मांडला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी महाराजा हरि सिंह यांचा जन्मदिवस आहे.”

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या विधानपरिषदेचे सदस्य राहिलेल्या विक्रमादित्य सिंह यांनी केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या तसेच जम्मू-काश्मीरचे विभाजन करुन त्याचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी म्हटले होते की, “सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमध्ये आता नव्या पर्वाला सुरुवात होईल. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतासोबत एकात्मता निर्माण होईल.”