Go back to India आयर्लंड या ठिकाणी भारतीयांवर होणारे हल्ले काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. या घटना घडत असतानाच एका सहा वर्षांच्या मुलीला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आयर्लंडच्या वॉटरफोर्ड भागात काही मुलांनी भारतीय वंशाच्या सहा वर्षांच्या मुलीला मारहाण केली आणि भारतात निघून जा म्हणत तिला बेदम चोप दिला. तिच्या प्रायव्हेट पार्टवरही या मुलांनी लाथा मारल्या. त्यामुळे या मुलीला असह्य वेदना झाल्या.
वंशद्वेषातून इतक्या लहान मुलीवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ
आयर्लंडमध्ये वंशद्वेषातून एखाद्या इतक्या लहान मुलीवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही दिवसांपूर्वी आयरिश मुलांनी या भारतीय मुलीवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलीची आई मागच्या आठ वर्षांपासून आयर्लंड या ठिकाणी काम करते आहे. तिला काही दिवसांपूर्वीच आयरिश नागरिकत्व मिळालं आहे.
मुलीच्या आईने नेमकं काय म्हटलं आहे?
आयरिश भाषेतल्या एका वृत्तपत्राला मुलाखत देताना पीडित मुलीच्या आईने ही संपूर्ण घटना सांगितली. तुम्ही घाणेरडे लोक आहात भारतात परत जा असं ती मुलं ओरडत होती आणि माझ्या मुलीला त्यांनी मारहाण केली. माझी मुलगी सोमवारी संध्याकाळी घराबाहेर खेळत होती त्यावेळी तिच्यावर एका मुलीने आणि १२ ते १४ वयोगटातील इतर मुलांनी हल्ला केला. ती इतकी लहान आहे तिला कसं मारायचं हा प्रश्नही त्यांच्या मनात आला नाही. त्यांनी तिला खूप मारहाण केली. संध्याकाळी ७ पर्यंत माझी मुलगी घरातच खेळत होती. त्यानंतर मी सायकलिंगला जाते असं मला तिने सांगतिलं. त्यामुळे मी तिला लवकर परत ये म्हणून सांगितलं आणि बाहेर जाऊ दिलं. पण तितक्यात ही घटना घडली. सुरुवातीला माझी मुलगी एकटी खेळत होती. माझं घरातून तिच्याकडे लक्ष होतं. तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीही होत्या. तर माझा १० महिन्यांचा मुलगा रडत होता म्हणून मी त्याला दूध पाजत होती. थोड्या वेळात तिला आणायला जाऊ असं मी ठरवलं आणि तितक्यात ही घटना घडली असं पीडित मुलीच्या आईने सांगितलं आहे.
मुलगी इतकी घाबरली होती की तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता
मी माझ्या मुलाला दूध पाजत होते त्यासाठी मी आतमध्ये गेले होते. अवघ्या काही मिनिटांतच माझी मुलगी घरात आली. ती खूप अस्वस्थ झाली होती आणि तिच्या तोंडून भीतीने शब्दही फुटत नव्हते. त्यावेळी मी तिच्या मैत्रिणींना बोलवलं आणि काय झालं ते विचारलं. त्यावेळी काही मुलांच्या जमावाने तिला मारहाण केली अशी माहिती मला मिळाली असं मारहाण झालेल्या मुलीच्या आईने म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.