गोव्यात भाजपने अखेर बाजी मारली असून मनोहर पर्रिकर सरकारने २२ विरूद्ध १६ मतांनी बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे पर्रिकर हे दोन दिवसच मुख्यमंत्री राहतील हा काँग्रेसचा दावा पोकळ ठरला आहे. निकाल लागल्यापासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या गोवा राज्यात १३ जागा जिंकूनही बहुमतासाठी आवश्यक असणारा २१ हा जाुदई आकडा पार करून भाजपने आपली सत्ता राखली. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले होते.  या बहुमत चाचणीत २२ आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला तर १६ आमदारांनी विरोध केला. एक आमदार यावेळी अनुपस्थित होते. मतदानापूर्वी काँग्रेसचे विश्वजीत राणे यांनी सभात्याग केला.

भाजपचे १३ आमदार असूनही राज्यपालांनी सरकार स्थापण्यासाठी भाजपला आवतण दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. काँग्रेसने सर्वाधिक जागा (१७) जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा केला नाही, याचा आधार घेत राज्यपालांनी पर्रिकर यांना सत्ता स्थापण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयानेही राज्यपालांचाच निर्णय योग्य ठरवत पर्रिकर यांना ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. व काँग्रेसला फटकारलेही होते.

दरम्यान, आज सकाळी काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी आपण सध्या पक्षातच असल्याचे सांगत मी काँग्रेसलाच मतदान करणार असल्याचे विधानसभेत जाताना माध्यमांशी बोलताना सांगितले. प्रारंभी सर्व नूतन आमदारांना शपथ देण्यात आली. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दोन दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. निवडणूक निकालानंतर पर्रिकर दिल्लीतून गोव्यात आले आणि १६ तासांत त्यांनी बहुमतासाठी आवश्यक आमदारांना भाजपकडे घेऊन सरकारची स्थापना केली. भाजपने आपल्याला कोणताच धोका नसून २२ आमदारांचे आम्हाला समर्थन असल्याचे म्हटले होते.
गोव्यात यंदा भाजपचे १३ आमदार निवडून आले आहेत. त्याचबरोबर भाजपला गोवा फॉरवर्ड पक्षाचे (जीएफपी) तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि इतर तीन आमदारांचे समर्थन मिळाले आहे. सर्व मिळून २२ आमदार भाजपकडे आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा त्यांच्याकडे एक आमदार जास्त आहे.
आकड्याच्या खेळात सध्या भाजप सरकारवर कोणतेच संकट नसल्याचे दिसते. पर्रिकरांनी भाजप सरकार सहज बहुमत सिद्ध करून पाच वर्षांपर्यंत सरकार टिकेल असा दावा केला आहे. पर्रिकर चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. यापूर्वी ते तीन वेळा मुख्यमंत्री बनले आहेत. पण एकदाही त्यांना पाच वर्षे पूर्ण करता आलेले नाही.

असे आहे पर्रिकर सरकार
मनोहर पर्रिकर, मुख्यमंत्री, फ्रांसिस डिसूजा- भाजप, पांडुरंग मडकेकर- भाजप, सुदिन ढवळीकर- मगोप, मनोहर त्रिंबक अजगांवकर- मगोप, विजय सरदेसाई- गोवा फॉरवर्ड पार्टी, विनोद पलियंकर- गोवा फॉरवर्ड पार्टी, जयेश विद्याधर साळगांवकर- गोवा फॉरवर्ड पार्टी, गोविंद गौडे- अपक्ष, रोहन खाउंटे- अपक्ष