शिवसेनेनं गोव्यामधील भाजपा सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. गोव्यामधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी केलेल्या घोषणांवरुन शिवसेनेनं भाजपाची गोव्यातील भूमिका आणि देशातील भूमिका परस्पर विरोधी असल्याची टीका केलीय. एकीकडे देशभरामध्ये बीफ बंदीची मागणी करायची आणि दुसरीकडे गोव्यामध्ये मात्र या उलट भूमिका घ्यायची असं म्हणता गोव्यामध्ये जुगाराचा धंदा वाढला असून हफ्तावसुली चालत असल्याचा आरोप शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून केलाय.
“गोव्यात पर्यटक खूप येतात. सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन निघाली आहे. गोवा आकाराने लहान आहे. म्हणून एका दिवसात गोवा पाहून अनेक लोक परत जातात. काही लोक गोव्यात खास करमणूक नाही, दोन दिवसांतच कंटाळा आला, असे सांगून परत जातात. त्या सर्वांनी निवडणूक मोसमात गोव्यात यायला हवे व मनोरंजनाचा आनंद घ्यायला हवा असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे राजकीय पर्यटनाचा ओघ वाढला आहे. बेडूकही ‘डराव डराव’ करू लागले आहेत व इकडून तिकडे उडय़ा मारू लागले आहेत. हे सर्व बेडूक उडय़ा मारताना राजकीय तत्त्वे, नीतिमत्ता याबाबत डराव डराव करतात, पण त्यामागे ‘सत्ता’ हेच एकमेव सूत्र आहे,” असं म्हणत शिवसेनेनं आधी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.
काही वर्षे जनतेची अशीच फरफट सुरू आहे
“गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसचा त्याग केला व आमदारकीचाही राजीनामा दिला. फालेरो हे प. बंगाल निवासी तृणमूल काँग्रेसमध्ये निघाले असल्याचे समजते. फालेरो सांगतात, ‘‘मी नावेलीमधील आपल्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेतला.’’ हा मोठाच विनोद आहे. मतदारांना गृहीत धरून नेता परस्पर निर्णय घेतो व जनतेची फरफट सुरू होते. गोव्यात गेली काही वर्षे जनतेची अशीच फरफट सुरू आहे,” असं लेखात म्हटलं आहे.
…पण गोव्यात तसे काहीच झाले नाही
“भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो स्वतःच्या ताकदीवर नाही. मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा अल्पमतात होता. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक १७ आमदार जिंकूनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास उशीर केला. या काळात भाजपाने फोडाफोड करून बहुमत विकत घेतले. हे सर्व काय व कसे घडले हे गोवेकरांना समजले आहे. गोव्यात १७ आमदारांवरून काँग्रेस पक्ष चारवर आला. भाजपाचा आकडा फुगला. हे काही नैतिकतेचे राजकारण नाही भाजपाने स्वबळावर २०-२५ जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसे काहीच झाले नाही,” असं लेखामधून म्हटलं आहे.
…तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल
“भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे. “कोविड काळात तर सरकारने स्वतःलाच ‘मृत’ घोषित केल्याने गावागावांत कोरोनाने कहर केला व त्यात लोकांचे बळी गेले. गोव्यातील आरोग्य व्यवस्था साफ कोलमडून पडली आहे. सरकारातले मंत्री व त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्त इस्टेटी विकत घेण्यात मशगूल आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल. गोव्यात रोजगाराचा प्रश्न भेडसावतो आहे. कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले व अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याच वेळी अमली पदार्थाने अनेक गावांना, समुद्रकिनाऱ्यांना विळखा घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
हे ढोंग नाही तर काय?
“कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपाला गोव्याला रुजवले. तेच भाजपा सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे. आता मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही. काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे गोव्याच्या मातीतले मूळ पक्ष, पण भाऊसाहेब बांदोडकरांसारखा नेता राहिला नाही व त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाचे अस्तित्वही उरले नाही. मगो पक्ष भाजपाने गिळून ढेकर देऊन पचवला आहे. याला जबाबदार ‘मगो’चे सध्याचे नेतृत्वच आहे. गोव्यातील लोकांना भाजपा हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपाच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल. भाजपा ही गोव्यातली खरी ‘बीफ’ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवे तितके ‘बीफ’ म्हणजे गोमांस मिळत आहे, हे ढोंग नाही तर काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.
असे कुणालाच का वाटू नये?
लेखाच्या शेवटी, “पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, पण गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत. या जुगारी व्यवसायातून राजकीय पक्षांना देणग्या मिळतात व निवडणुका लढवल्या जातात. पोर्तुगीजांविरुद्ध लढलेला गोवा या नव्या वसाहतवाद्यांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाडय़ा निर्माण होतात, स्वतःचे दोनेक आमदार निवडून आणतात व जे सरकार येईल, त्यांच्यात सामील होऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. यात गोव्याचे नुकसानच झाले आहे. गोव्यातील उद्याच्या निवडणुकांत तरी हे चित्र बदलावे. अल्बुकर्कने गोवा जिंकले व ४५० वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवले. गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये?,” असा प्रश्न विचारण्यात आलाय.