एकीकडे देशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा सुरू असतानाच गोव्यात मात्र काँग्रेसच्याच आमदारांना मात्र राहुल गांधींची ही यात्रा जोडून ठेवू शकली नाही. गोव्याचे माजा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसच्या राज्यातल्या ११ पैकी आठ आमदारांनी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राज्यात बॅकफूटला गेलेल्या पक्षाला पुन्हा कसं सावरायचं? असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पडल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान, एकीकडे काँग्रेसला बसलेल्या धक्क्याची चर्चा होत असताना दुसरीकडे दिगंबर कामत यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये दिगंबर कामत यांना प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी भाजपा पक्ष प्रवेशाबाबत विचारणा केल्यानंतर त्यावर कामत यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. “मी देवळात गेलो. तिथे देवी-देवतांना मी विचारलं की याबाबत (भाजपात प्रवेश करण्याबाबत) मी नेमकं काय करू? आमच्याकडे एक प्रथा आहे प्रसाद घेण्याची. तेव्हा देव म्हणाला, तू काळजी करू नकोस. जा पुढे”, असं दिगंबर कामत म्हणाले आहेत.
निवडणुकीत काय झालं?
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले. पण सत्ता मात्र भाजपाकडे गेल्यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. याच अस्वस्थतेमुळे काँग्रेसचे अनेक आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. अखेर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये दिगंबर कामत यांच्यासमवेत मायकल लोबो, डिलेला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प अमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस या आमदारांचा समावेश आहे.
गोव्यात पुन्हा काँग्रेसमध्ये फूट ; अकरापैकी आठ आमदार भाजपमध्ये
‘ते’ तीन आमदार कोणते?
दरम्यान, आठ आमदारांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षासोबत राहिलेल्या तीन आमदारांची देखील चर्चा सुरू झाली आहे. यात युरी आलेमाव, अल्टोन डिकोस्टा आणि कार्लोस अल्वारेस फरेरा या तीन आमदारांनी आपण पक्षासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, दुसरीकडे या मेगाभरतीमुळे भाजपाचं विधानसभेतलं संख्याबळ २८वर गेलं आहे.