मीरामार किनाऱ्यानजिक गेल्या काही काळापासून एक निकामी मालवाहू जहाज अडकले असून ते वेळीच तेथून न हटविण्यात आल्यास गोव्याच्या किनारपट्टीसह राज्याच्या पर्यावरणासही धोका उत्पन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या जहाजाचे नष्ट झालेले इंजिन आणि त्यामधील ४०० मेट्रिक टन इंधन या हानीस कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे जहाज एखाद्या ‘टाइम बॉम्ब’सारखे असून त्यावरील एखादी ठिणगीही मोठय़ा स्फोटास कारणीभूत ठरू शकते, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.
राज्याच्या पर्यावरण खात्याने बुधवारी यासंबंधी एक आदेश जारी केला असून, एमव्ही प्रतिभा भीमा हे जहाज धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले.
मुंबईच्या मेसर्स प्रतिभा शिपिंग कंपनीला त्यासंबंधी नोटीस बजावून सदर जहाज तेथून १५ दिवसांत हटविण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री निखिल देसाई यांनी दिली. कंपनीने तशी कार्यवाही न केल्यास हे जहाज सरकारकडून निकाली काढण्यात येईल, असेही देसाई म्हणाले.
हे जहाज डिसेंबर २०१३ मध्ये गोवा बंदर विभागाने त्यावरील कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतले होते. या कर्मचाऱ्यांना तेथून अन्यत्र हलविण्यात आल्यानंतर जहाज मनुष्यविरहितच झाले. सदर जहाज सध्या कार्यरत नाही आणि त्यावर कोणी कर्मचारीही नसल्यामुळे सुरक्षेला धोका उत्पन्न झाला असून, अन्य जहाजांनाही धोका निर्माण होऊ शकतो. या जहाजामधील ४०० टनी इंधनामुळे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनाक्षम असलेली गोवा किनारपट्टीही धोक्यात येऊ शकते, असे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
गोव्याच्या किनारपट्टीस निकामी जहाजाचा धोका
मीरामार किनाऱ्यानजिक गेल्या काही काळापासून एक निकामी मालवाहू जहाज अडकले असून ते वेळीच तेथून न हटविण्यात आल्यास गोव्याच्या किनारपट्टीसह
First published on: 13-02-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa government order to remove stuck ship on goas shore