बलात्कारप्रकरणातील आरोपी आणि तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालविरुद्धच्या खटल्याचे वृत्तांकन करण्यास गोव्यातील मापुसा न्यायालयाने बंदी घातली आहे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या तरुण तेजपालला शुक्रवारी मापुसामधील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने माध्यमांना या खटल्याचे वृत्तांकन करण्यास बंदी घातली. भारतीय दंड विधानातील कलम ३२७ (३) अंतर्गत ही बंदी टाकण्यात आली.
जानेवारी २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टाने तेजपालविरोधात खटल्याला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली होती. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांनी आरोपीपक्षाला सर्व कागदपत्र मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
नोव्हेंबर २०१३ मध्ये बांबोळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या महिला सहकारी पत्रकारावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपालवर आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. बलात्कार, लैंगिक शोषण, आपल्या कनिष्ठ सहकारी महिलेचा विनयभंग असे विविध आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते. भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ अ (लैंगिक छळ), कलम ३४१, ३४२, कलम ३७६ (बलात्कार), ३७६(२)(एफ) आणि ३७६ (२)(के)(आपल्या पदाचा गैरवापर करीत सहकारी महिलेवर बलात्कार करणे) अशा कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. बलात्काराचे प्रकरणसमोर आल्याने तेजपालला तेहलकाच्या संपादक पदावरुन पायउतार व्हावे लागले होते.