Goa Tourism Statistics 2025 Analysis: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया आणि इंटरनेटवर गोव्याचे पर्यटन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गोव्यातील पर्यटकांची संख्या अजिबात कमी झालेली नसून, प्रत्यक्षात ती वाढली आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

गोव्याच्या पर्यटकांच्या संख्येत जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण ६.२३ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये देशांतर्गत पर्यटकांची संख्या ५.३६ टक्क्यांनी वाढली आहे. २०२४ मध्ये ही संख्या ६९,२४,९३८ होती, तर २०२५ मध्ये ती ७२,९६,०६८ इतकी झाली आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या २९.३३ टक्क्यांनी वाढली असून ती २,५९,८२० वरून ३,३६,०३१ इतकी झाली आहे.

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. गोव्याच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे १६.४३ टक्के आहे. याचबरोबर, पर्यटनामुळे गोव्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे ४५ टक्के रोजगार निर्माण होतात.

गोवा सरकारच्या मते, आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या वाढत्या संख्येमागील सर्वात मोठे कारण म्हणजे रशिया आणि मध्य आशियातील देशांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न.

याचबरोबर आता गोवा ते रशियातील एकातेरिनबर्ग, नोवोसिबिर्स्क आणि मॉस्को या शहरांमध्ये विमानसेवा उपलब्ध झाली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये गोवा ते रशिया आणि कझाकस्तानसाठी ३४ चार्टर्ड विमानसेवा सुरू झाल्या आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनमधील आघाडीच्या चार्टर ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या टीयूआय एअरवेजनेही ब्रिटन–गोवा विमानसेवा सुरू केली आहे. या हंगामाच्या सुरुवातीला टीयूआय मँचेस्टर आणि गॅटविक ते गोवा अशी थेट सेवा देणार आहे. यामुळे गोव्यात अंदाजे ३०,००० ते ४०,००० ब्रिटिश पर्यटक येण्याची शक्यता आहे. यामुळे गोवा केवळ हिवाळा–उन्हाळ्याच्या पर्यटनासाठी नव्हे तर वर्षभरासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळवत आहे.

गोव्याचे नागरिक, सरकार आणि खाजगी संस्थांच्या सहकार्यामुळे राज्यातील पर्यटन अधिक विकसित होत आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, विविध पर्यटकांचे अनुभव आणि जगभरात गोव्याच्या पर्यटनाबद्दल वाढती चर्चा या सर्वांमुळे गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढत आहे.

सोशल मीडियावर गोव्याचे पर्यटन क्षेत्र संकटात आहे किंवा पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत आहेत अशा चर्चा होत असल्या तरी, आकडेवारी मात्र ही चर्चा खोटी ठरवत आहे.