विविध देशांमधून सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्यासाठी तस्कर नवे नवे मार्ग शोधून एजन्सींना चकवा देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, तस्करी विरोधात सज्ज असलेल्या एजन्सी तस्करांच्या या नव नवीन पद्धती आणि प्रयत्नांना वारंवार फोल ठरवत असतात. असंच एक ताजं प्रकरण कर्नाटकातील मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलं आहे. मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने चक्क हेअर बँडद्वारे केली जाणारी सोन्याची तस्करी पकडली आहे. तस्करीची ही पद्धत अनोखी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दुबईहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट क्रमांक IX ३८४ मध्ये महिलांच्या हेअरबँडमध्ये बसवलेल्या मण्यांच्या आतमधून सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कस्टम विभागाने शनिवारी २१ ऑगस्ट रोजी मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. ११५ ग्रॅम वजनाच्या हेअरबँडची एकूण किंमत ५ लाख ५८ हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याची पुनर्प्राप्ती कमी असू शकते. परंतु, तस्करीची ही पद्धत अनोखी आहे.

तस्करीच्या ‘या’ दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनं जप्त

रविवारी एका घटनेत अधिकाऱ्यांनी ब्लेंडरच्या आर्मेचरमधून सोन्याची तस्करी आणि इतर वैयक्तिक सामानासह केरळमधील कासारगोड येथील एका प्रवाशाला अडवलं. यावेळी त्याच्याकडून १६.८५ लाख रुपये किंमतीचं निव्वळ ३५०.३३ ग्रॅम वजनाचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील मुरडेश्वर येथील रहिवासी असलेल्या एका पुरुष प्रवाशाकडून ५.५८ लाख रुपये किंमतीचं ११५ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. प्रवाशाने हेअरबँडच्या मण्यांमध्ये हे सोनं लपवल्याचं यावेळी समोर आलं. तस्करीची ही पद्धत पाहून अधिकारी देखील आवाक झाले आहेत.