गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागील गुंड गोल्डी ब्रार याचा कॅलिफोर्नियातील गोळीबारात मृत्यू झाल्याच्या वृत्ताचे अमेरिकन पोलिसांनी खंडन केले आहे. फ्रेस्नो, कॅलिफोर्नियामधील फेअरमाँट आणि होल्ट अव्हेन्यूमध्ये काल भांडणानंतर दोन पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या. त्यापैकी एकाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला, असे अमेरिकन पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेत मारलेली व्यक्ती कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार असल्याचा अंदाज लावला. हे वृत्त काही वृत्तसंस्थांनीही उचलून धरले.
फ्रेस्नो पोलीस विभागाने आता या अहवालांना प्रतिसाद दिला आहे. त्यांनी हे वृत्त खोटे असल्याचं म्हटलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, एका प्रश्नाला उत्तर देताना लेफ्टनंट विल्यम जे. डूली म्हणाले, “गोल्डी ब्रार हा गोळीबाराचा बळी असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांमुळे तुम्ही चौकशी करत असाल, तर आम्ही याची पुष्टी करू शकतो की हे पूर्णपणे सत्य नाही. ” तसंच, या प्रकरणी पोलिसांकडून जगभरात चौकशी सुरू आहे, असंही ते म्हणाले.
“सोशल मीडिया आणि ऑनलाइन न्यूज एजन्सींवर चुकीची माहिती पसरल्याचं आम्हाला कळालं. ही अफवा कोणी सुरू केली याची आम्हाला खात्री नाही, पण ती पसरली आणि वणव्यासारखी पसरली.पण हे वृत्त खोटं आहे. मारला गेलेला व्यक्ती गोल्डी ब्रार नक्कीच नाही,” असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं. दरम्यान, या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीची ओळख आता ३७ वर्षीय झेवियर गॅल्डनी म्हणून झाली आहे.
कोम आहे गोल्डी ब्रार?
सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार हा वॉन्टेड गुन्हेगार आहे आणि त्याला बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख सदस्य मानला जाणारा गोल्डी ब्रारने फेसबूक पोस्टद्वारे पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो चर्चेत आला होता. सिद्धू मूसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील त्यांच्या गावाजवळ त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.