नवी दिल्ली : कॅनडामधील भारतीय आणि तेथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना शुक्रवारी भारत सरकारतर्फे देण्यात आली. कॅनडामध्ये सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया, भारतीयांबद्दलच्या द्वेषातून होणारे गुन्हे तसेच पंथीय हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याने भारतीयांनी तेथे दक्षता बाळगावी, असे या सूचनेत म्हटले आहे.
भारताच्या परराष्ट्र खात्याने ही कॅनडाबाबतची सावधगिरीची सूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीयांविरोधात घडणाऱ्या या घटनांबाबत तेथील भारतीय दूतावास आणि उच्चायुक्तालयाने कॅनडा सरकारच्या संबंधित विभागांना माहिती दिली असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतीयांविरोधात घडलेल्या अशा गुन्ह्यांच्या प्रकरणात अद्याप आरोपींवर खटले दाखल झालेले नाहीत, असेही भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. हे लक्षात घेता तेथील भारतीय नागरिक, भारतातून गेलेले विद्यार्थी आणि कॅनडात जाण्याचा बेत असलेले भारतीय नागरिक- विद्यार्थी यांनी दक्ष राहावे. कॅनडातील भारतीयांनी आपली माहिती ओट्टावा येथील भारतीय उच्चायुक्तालय किंवा टोरंटोतील भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ किंवा मादाद पोर्टल (madad.gov.in) वर नोंदवावी, असे आवाहनही परराष्ट्र खात्याने केले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना या भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे शक्य होईल.
कॅनडात खलिस्तानवाद्यांनी पंजाबला स्वतंत्र देश घोषित करण्याचा ठराव पुढे आणला असून त्याला रोखण्यासाठी कॅनडा सरकारकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत, असे मानले जाते. भारताने म्हटले आहे की, कॅनडा या भारताच्या मित्रदेशात अतिरेकी शक्तींना राजकीय हेतूने असा ठराव मांडण्यास मुभा मिळते, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. पण कॅनडा सरकारने म्हटले आहे की, ते भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचा आदर करतात आणि खलिस्तानवाद्यांच्या कथित ठरावाला कॅनडा सरकार मान्यता देणार नाही.
भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची म्हणाले की, आम्ही हा प्रश्न राजनैतिक मार्गाने कॅनडा सरकारकडे मांडला आहे. खलिस्तानवाद्यांचा कथित ठराव हा एक फार्स आहे.